Friday, December 10, 2010

सांकेतिक भाषा

काल सकाळी ऑफिसला जायला जरा आरामातच निघालो, आदल्या दिवशी घरी यायला खूप उशीर झाला होता त्याची कसर भरुन काढत होतो. सकाळी साधारण साडेअकरा ची लोकल पकडली, ह्यावेळी अजुन तरी फर्स्टक्लासच्या डब्यात कमी गर्दि असते. ऑफिसची बॅग वरती स्टॅन्डवर ठेवून जागेवर बसलो. हल्ली थंडिपण थोडीफार जाणवायला लागली असल्याने साडेअकरा वाजता सुद्धा छान प्रसन्न वाटत होत. मग जरा स्थिरस्थावर झाल्यावर आजूबाजूला नजर फिरवली. डब्यात खूपच कमी लोक होती, आणि जे होते ते आपापल्या उद्योगात गुंग होते. सहजच माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं तिथे कॉलेजला जाणारी तीन मुलं बसली होती, तिघांनीही आपली डोकी कुठल्यातरी इंजिनिअरींगच्या पुस्तकात घातली होती, बहुतेक परीक्षेचा अभ्यास करत असतील असा विचार करुन मी परत खिडकीतून बाहेर बघु लागलो.

थोड्यावेळानं माझं लक्ष पुन्हा त्या मुलांकडे गेलं आणि मी स्तब्धपणे त्यांच्याकडे बघतच राहिलो, अहो ती हातवारे करत एकमेकांशी संवाद साधत होती म्हणजे ते तिघेही मुके किंवा बहिरे होते. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे बघतच बसलो कारण दैवान त्यांच्याशी असा क्रूर खेळ खेळला असला तरीही त्यांनी त्याच्यावर मात करत इंजिनिअरींग पर्यंत ची मजल मारली होती. मला त्या तिघांचे खरच अगदी मनापासून कौतुक वाटलं. थोडावेळ तसाच त्यांच्यातला तो संवाद समजण्याचा प्रयत्न करत बसलो. पूर्वी दूरदर्शनवर दर रविवारी दुपारी मुक्या आणि बहिर्‍या लोकांकरता बातम्या लागत. तेव्हा वाटे ह्या अशा काय बातम्या आहेत ज्यात ती वृत्त निवेदिका ओठांच्या हालचाली आणि हातवारे करत बातम्या देत आहे. मी जेव्हा ह्या लोकांना इतरांशी संवाद साधताना पहातो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपले बोलणे इतरांना पटवून देण्याचा त्यांचा उत्साह. जो पर्यंत तुम्हाला त्याचं म्हणण कळत नाहि तो पर्यंत ते तुम्हाला समजावत असतात अगदी न थकता.

आपण जर इतिहासात डोकावून पाहिल तर ह्या मुक्या आणि बहिर्‍या लोकांना पुर्वी समाजात अत्यंत नगण्य असं स्थान होत. त्यांना कोठल्याही सामाजिक कार्यक्रमाला यायची पूर्णपणे बंदि होती. साधारण बाराव्या शतकात इस्लामिक हिदायत मध्ये ह्यांच्या वरील बंधन बरीच शिथिल करण्यात आली होती, म्हणजे त्यांना समाजात उठण्या बसण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण त्या काळात सुद्धा ह्या लोकांशी संवाद साधण्यासाठी ठोस अशी भाषा उपलब्ध असल्याच दिसत नाहि. हिंदू धर्मात हातांच्या विविध हालचालीतून कथा सांगण्याची कला अस्तित्वात होती ज्याला मुद्रा असहि म्हणतात पण त्या सुद्धा नृत्य आणि नाटक ह्यांच्या पुरत्याच मर्यादित होत्या. साधारण वीसाव्या शतकात नागा जातीच्या लोकांमध्ये मुक्या आणि बहिर्‍या लोकांशी संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जात असल्याची नोंद मिळते. प्रसिद्ध समाज अभ्यासक जॉन हेन्री हटून लिहितो, "नागा लोकांनी सांकेतिक भाषेत खूपच प्रगती केली आहे. म्हणजे एखादा मुक मनुष्य संपूर्ण कथा आपल्याला त्याची भाषा जाणणर्‍या भाषांतरकाराच्या साहाय्याने सांगु शकतो, एवढच नाहि तर तो त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण तक्रार कुठलाही मुद्दा न गाळता करु शकतो. थोडा त्रास होतो तो नावांचा, पण ती सुद्धा वर्णनावरून कळतात." पण हे फक्त ह्या विशिष्ठ जमातीपूर्तच मर्यादित होत, बाकीच्या ठिकाणी अजूनही मुक्या आणि बहिर्‍या लोकांची दुरावस्थाच होती.

पुढे १८३० पासून शाळा आणि अनाथाश्रमातून सांकेतिक भाषा शिकवायला सुरुवात झाली, पण तिला असं काहि प्रमाण शास्त्र नव्हत. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुक्या आणि बहिर्‍या लोकांकरता खास शाळा सुरु झाल्या. बॉम्बे इन्स्टीट्यूट फॉर डेफ हि पहिली शाळा १८८० साली बिशॉप लिओ मेरीन यांनी मुंबईत सुरु केली. पुढे अशाच प्रकारच्या शाळा त्यावेळचं मद्रास(चेन्नई) आणि कलकत्ता इथे सुरु झाल्या. हे लोण पुढे भारत, पाकिस्तान, आणि श्रीलंकेतल्या बर्‍याच शहरात पसरलं. त्या काळात ह्या डेफ स्कूलमध्ये ओरालीस्ट म्हणजे ओठांच्या हालचालींवरुन भाषा शिकवण्यात येत असे. ह्या शाळा हातवार्‍यांच्या सांकेतिक भाषेचा वापर कर नसतं. पण बर्‍याच विद्यार्थ्यांना हि ओठ वाचण्याची कला अवगत व्हायला फार कठिण वाटे, तेव्हा ती मुलं शाळेत एकमेकांशी बोलण्या करता हातवार्‍यांचीच भाषा वापरत, पण ते करण्यापासून त्यांचे शिक्षक त्यांना परावृत्त करत असत. १९२८ साली ब्रिटीश शिक्षिका एच. सी. बॅनर्जी ह्यांच्या हि गोष्ट लक्षात आली. त्यांनी भारतातील तीन विविध शाळांना भेटि दिल्या आणि साधारण सगळ्यांमध्ये समानता असलेली एक सांकेतिक भाषा तयार केली. पुढे हिचच पुनरावलोकन होत IPSL म्हणजे इंडो-पाकिस्तान साईन लँग्वेजेस निर्मिती झाली. IPSL नी सांकेतिक भाषेत व्याकरण आणल, त्यामुळे ती भाषा अधिक शुद्ध आणि समृद्ध होत गेली. IPSL च्याच धर्तीवर ASL(अमेरीकन साईन लँग्वेज) जी मुख्यत्वे अमेरीका आणि मित्र राष्ट्रात वापरली जाते आणि BSL(ब्रिटिश साईन लँग्वेज) हि मुख्यत्वे ब्रिटनमध्ये वापरली जाते ह्या भाषा सार्‍या विश्वात अवगत आहेत.

आज ह्या सांकेतिक भाषेने खूपच प्रगति केली आहे. अगदी एडिसन पासून ते सर. विल्यम मॅकमोहन (जे एके काळि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते) हे सगळे मुके किंवा बहिरेच होते पण त्यांनी ह्या सगळ्यावर मात करत आपलं जीवन समृद्ध केलं. मला वाटत तो दिवस आता दूर नाहि ज्यावेळी सांकेतिक भाषा हि प्रत्येक शाळेत मुख्य भाषेच्या दर्जात येऊन बसेल. खरच जर प्रत्येकाला हि सांकेतिक भाषा कळली तर मुका आणि बहिरा हे शब्दच आपल्या भाषेतून नष्ट होतील आणि मला त्या दिवसाची प्रतिक्षा आहे.

- वरील माहिती विकिपीडियाच्या सौजन्याने.

No comments:

Post a Comment