Monday, March 14, 2011

शेगांव ते अकोला

परवा शेगांव वरून अकोल्याला जायचा योग आला आणि तोही आपल्या लाल डब्यातून म्हणजे एस टि हो. झालं असं कि सक्काळी अगदी लवकर शेगावला माऊलीच अगदी सुखात (रांगेत तिष्ठत उभं न राहता) दर्शन झालं आणि सुखावलो. खूप छान वाटल, मग मस्तपैकी नाश्त्यावर ताव मारला. सक्काळी खूपच लवकर उठल्यामुळे थोडावेळ भक्तनिवासमधील खोलीत थोडावेळ आराम केला. साधारण दुपारी बारा साडेबाराला आनंदसागरला जायला निघालो. हल्ली शेगावला आलं आणि आनंदसागरला भेट दिली नाहि कि पूर्णत्वचं वाटत नाही. आनंदसागरच ते रम्य विलोभनीय वातावरण डोळ्यात साठवलं कि कसं छान वाटत. एकदा इथं आलं कि संपूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही. हल्ली इथे तिकीट काढायला लागत, पूर्वी मात्र जर तुमच्याकडे अभिषेकच्या पावत्या असतील तरीसुद्धा तुम्ही आत प्रवेश करू शकत होता. दुपारी जेवणाच्या वेळेतच पोहोचलो असल्यानं दुपारचं जेवण इथेच उरकलं. मग थोडावेळ विश्रामवाटिकेत विश्राम करावा म्हणून तिथं निघालो तर समोरच संपूर्ण आनंदसागर फिरवून आणणारी तॊ छोटीशी रेल्वेगाडी दिसली मग काय आम्ही सगळे त्या गाडीत शिरलो. गाडीतून आनंदसागरला एक फेरी मारून झाल्यावर थोडावेळ विश्रामवाटिकेत आराम केला. साधारण चार वाजता उन्ह उतरायला लागल्यावर आम्ही बच्चे कंपनी बरोबर बागेत विविध खेळ खेळायला गेलो. मग दमून भागून येऊन संध्याकाळच्या अल्पोपहाराचा फडशा पाडला. आनंदसागर हि इतकी सुंदर आणि विलोभनीय जागा आहे कि इथे वेळ कसा जातो ते कळतच नाहि. इथे सगळ छान आहे पण एक गोष्ट मात्र मला नेहमीच खटकते, इकडचे सगळे सूचना फलक हिंदीतून आहेत. मला मान्य आहे कि हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्र भाषेबरोबर मात्रुभाषेला पण अग्र स्थान दिले तर ह्या जागेची शोभा नक्कोच अजुन वाढेल. असो, मग अल्पोपहारानांतर मात्सालय पहायला गेलो. विविध रंगाताले, दंगाताले, निरनिराळ्या आकारातले ते मासे अगदी आकर्षक वाटत होते. मत्सालायातून बाहेर येईस्तोवर चांगलाच अंधार पडला होता, त्यामुळे आता शेवटच ठिकाण बघायचे म्हणून लाईट आणि मूझीक शोला भेट दिली. ह्या कार्यक्रमाची मजा काही औरच असते, संगीताच्या तालावर आणि रंगीत प्रकाश झोतात कारंजाताले तुषार जणू नर्तनच करत असल्याच भासतं, अगदी मंत्रमुग्ध करणारा हा अनुभव असतो. थोडावेळ हा नयनरम्य कार्यक्रम पाहून मग परत भक्तानिवासच्या दिशेने निघालो.

ह्यावेळेस शेगावावारून परत मुंबईला यायच्या ऐवजी अकोल्याला एका नातेवाईकांकडे जाण्याचा बेत होता त्यामुळे सगळ सामान आवरून साधारण सव्वा आठ वाजता भक्त निवास सोडल आणि शेगाव स्टेशन गाठल ते मिळेल ती गाडी पकडून अकोल्याला जायला, बरोबर बायको आणि मुलगी पण होते. मुंबईची सवय असणाऱ्या आम्हाला हा प्रवास आणि हे ठिकाण अगदीच अनोळखी होत. स्टेशनवर आल्यावर कळल की अकोल्याला जाणारी पुढची गाडी रात्री दहा वाजता आहे, मग तिथेच तिकीट खिडकीवर चौकशी केली तेव्हा कळल की साधारण नऊच्या सुमारास जवळच असलेल्या एस टि स्टॅन्ड वरून अकोल्याला बस सुटते जी दहा वाजेपर्यंत अकोल्याला पोहोचते. दहा पर्यंत शेगावामध्ये गाडीची वाट बघत बसण्यापेक्षा सरळ बसनीच जाऊ म्हणजे गाडीपेक्षा लवकर पोहोचू सुद्धा असा विचार करत एस टि स्टॅन्डला गेलो. इथे आल्यावर जाणवलं की सगळ जग बदललंय पण आपले एस टि स्टॅन्ड अजूनही तसेच जुनाट आहेत. समोरच चौकशी केंद्र दिसलं, तिथे अकोल्याला जाणाऱ्या बसची चौकशी केली तेव्हा नेहमीप्रमाणे उडवाउडवीच उत्तर न मिळता चक्क व्यवस्थितपणे उत्तर मिळाल की नऊ वाजता समोरून बस सुटेल. नंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे ते त्रासिक भाव बघून माझी ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारायची हिंमतच झाली नाहि. मग आम्ही तसंच तिथे वाट पहात बसलो, तेवढ्यात समोरून एक बस येताना दिसली तशी सौ म्हणाली बघ कदाचित हिच बस असेल म्हणून. मग मी त्या बसच्या दिशेने धावत सुटलो, आतली लोक अजूनही उतरतच होती आणि बाहेरची माणसं आत शिरण्याकरता धक्का बुक्की करत होते. त्या गर्दीतच एक दोन जणांना विचारल की हि बस कुठे जाणार पण कोणीच धड उत्तर दिल नाहि. मग समोरच एक खाकी गणवेशातला माणूस दिसला बहुतेक तो ड्रायव्हर होता, त्याला विचारल तर त्यान हि बस अकोल्याचीच असल्याच सांगीतल. मग आम्ही पण बसमध्ये चढण्याकरता त्या रेटारेटीत घुसलो. खांद्यावर सॅक, कडेवर मुलगी आणि सोबत चढणाऱ्याची ती प्रचंड रेटारेटी असे सगळ सांभाळत मी कसातरी बसच्या आत चढायला लागलो. तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्या जीन्सच्या पाकीट असलेल्या खिशात हात घालत आहे, मग मी हिंदी आणि मराठी मिळेल त्या भाषेत आरडाओरडा करायला सुरूवात केली तसा एक वेगळाच गोंधळ उडाला, तेवढ्यात त्याने हात पटकन काढून घेतला. ह्या सगळ्या गोंधळात मला मात्र पटकन आत चढायला मिलाल, आतमध्ये पहिली सगळी आसन आधीच भरली होती मग साधारण शेवटून तिसऱ्या रांगेत जागा मिळाली तेही तिघाजणांची सीट आडवुन ठेवणाऱ्या मुलाला विनंती केल्यावर,

थोड्याच वेळात बस पूर्णपणे भरून गेली. आमच्या मागच्या जागेमध्ये प्रचंड गोंधळ सूरू होता कारण काही टारगट मुलांचा घोळका येऊन तिथे बसला होता. त्यांचा जोरजोरात आरडाओरड चालू होता, त्यातल्याच दोन जणांनी मोबाईलवर मोठ्या आवाजात कुठलीतरी टुकार हिंदी गाणी लावली होती. बस काही हलायला तयार नव्हती, खूपच गरम व्हायला लागलं होत. अशातच माझ्या मनात परत एकदा शंकेची पाल चुकचुकली जर हि बस अकोल्याची नसेल तर? कारण बसच्या पुढे तस काहीच लिहील नव्हत. तशातच बाजूलाच धक्के खात असलेल्या एका साधारण खेडवळ दिसणाऱ्या व्यक्तिने मला आत सरकायला सांगीतल, थोडे आढेवेढे घेत मी आत सरकलो तसा तो माझ्या बाजूला बसला. त्यानेच विचारल कुठे चाललात म्हणून मग मी त्याला अकोल्याला असं सांगीतल, तर तो म्हणाल हि बस अकोल्याला नाहि तर बाळापूरला जाते, हे ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. मी लगेच सौला हे सांगीतल तसं ती म्हणाली की तिनं आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या आणि जरा सुस्वरूप दिसणाऱ्या मुलींना आधीच विचारल होत. त्यांनी तिला हि बस अकोल्यालाच जाणार असल्याच सांगीतल होत आणि त्याही अकोल्याच्याच होत्या. पण माझं किहि समाधान होईना, एक तर रात्रीची वेळ आणि हे असं अनोळखी ठिकाण, मी परत तिच्या डोक्याशी भूणभूण सुरु केली की तू त्या मुलींना परत विचार की त्या पण अकोल्यालाच उतरणार आहेत म्हणून. मग तिन तस विचारल तेव्हा त्यांनी तिला हो सांगीतल तसं तो माझ्या बाजूचा माणूस त्यांना पण ही बस फक्त बाळापूर पर्यंत जाणार असल्याच म्हणाला, आता त्या मुली पण चक्रावून गेल्या होत्या. एव्हाना बसमध्ये ड्रायव्हर पण येऊन बसला होता, पण कंडक्टर काहि दिसत नव्हता. मग त्यातल्याच एका मुलीन खिडकीतून खाली उभ्या असलेल्या त्यांच्याच ओळखीच्या एका मुलाला ड्रायव्हरला जाऊन विचारायला सांगीतल. तो मुलगा धावत गेला आणि ड्रायव्हरला विचारुन आला आणि त्यान ती बस अकोल्याचीच असल्याला दुजोरा दिला तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. एव्हाना बसमधल्या त्या टारगट मुलांचा गोंधळ आजुनच वाढला होता. शेवटी एकदाची बस सुरू झाली आणि थोड़ी हवेची झुळूक आली तसं एकदम ब़र वाटल. पण आजुनही कंडक्टर काही दिसत नव्हता, थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की त्या बसचा कंडक्टर एक स्त्री होती आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती त्या गर्दीतून वाट काढत काढत स्वताच काम अगदी चोख बजावत होती. मी लगेच सौच लक्ष तिथे वेधलं, आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक असे दोन्ही भाव उमटले होते. खरच किती धैर्य वाटत होत तिच्यात, एवढ्या गर्दीत आणि तेही एवढ्या रात्रीच्या वेळी ती सराईतपणे आपलं काम करत होती तेही अशा ग्रामीण भागात. हळूहळू ती गर्दीतून वाट काढत आणि तिकिट देण्याच काम करत त्या टारगट मुलांच्या घोळक्यात शिरली, तशा सगळ्यांच्याच नजरा तिथे लागल्या की ही आता कसं काय निभावून नेणार ते. पण ती अगदी निर्विकारपणे तिचं काम करत होती, तिचं लक्ष त्या मुलांकडे अजिबात नव्हत. थोड्याच वेळात ती अगदी शेवटच्या आसनापर्यंत सगळ्यांना तिकिट देऊन पुन्हा गर्दीतून वाट काढत पुढे निघून गेली पण.

आता बसन पण चांगलाच वेग घेतला होता, बाहेरचा रस्ता अगदी खराब होता त्यामुळे बसमध्ये अशक्य खड्खड असा आवाज येत होता. खिडक्यांची काचेची तावदान जोरजोरात वाजत होती. मला तर वाटल की हे असं आजून थोडावेळ जरी चालू राहील तरी ही तावदान खाली पडतील. विचारांच्या नादात अकोला कसं आलं कळलच नाही. आम्ही बसमधून बाहेर पडलो, ते ह्या प्रवासातल्या संमिश्र आठवणी घेऊनच.

1 comment:

  1. छान,वाटले, एक मिनीट्भर शेगाव, अकोला आठवले, जननी अन जन्मभुमी!!!! दोन्ही आठवले, अकोला माझे गाव, बाराभानगडींसहीत माझे गाव..

    ReplyDelete