Wednesday, November 24, 2010

मुंबईत मराठी FM चा ढोल

साधारण जुलै महिन्यात एक बातमी मीडियावाल्यांनी चघळली (आजकाल हे मिडियावाले हेच करतात), शिवसेना प्रमुखांनी मुंबईतल्या खासगी FM वाहिन्यांना लवकरात लवकर मराठी गाणी ऐकवा नाहितर मिरच्यांची धुरी देऊ अशी गोड धमकी दिली आणि आम्हा मराठी रसिकांमध्ये आनंदाची एक लहर उठली. चला म्हणजे आता तरी आम्हाला मराठी गाणी ऐकायला मिळतील कारण सेना प्रमुखांच्या विरुद्ध जाण्याची मुंबईत तरी कोणाचीच हिंमत नाहि. लगेच अनेक वाहिन्यांनी आश्वासन दिली कि लवकरात लवकर मराठी कार्यक्रम चालु करु. रेडिओ मिर्चिनी तर म्हणे सेना प्रमुखांना पत्रही पाठवल आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी पासून म्हणजे १ ऑगस्ट पासून मराठी कार्यक्रम सुरु करायच आश्वासन दिलं.

आज जवळ जवळ चार महिन्यांनंतरच परीस्थीती अशी आहे कि आम्हा मराठी रसिकांना ह्या खासगी वाहिन्यांनी नुसत्याच वाटाण्याच्या अक्षता दिल्यात. रेडिओ मिर्चिनी तर आठवड्यात फक्त दोनच तास मराठीला राखून जणु आमच्यावर मोठे उपकारच केलेत असा अविर्भाव आणला आहे. आता आपण जर मुंबईतल्या FM वाहिन्यांचा पसारा पाहिला तर इथे एकूण ९ FM वाहिन्या आहेत. ह्यातल्या दोन सरकारी म्हणजे आकाशवाणीच्या तर बाकि सात खासगी आहेत. म्हणजे एवढ्या नऊ वाहिन्या असूनही आम्ही मराठी रसिक तहानलेले. आता हेच बघा ना माझ्याच महाराष्ट्रात, माझ्याच मुंबईत मराठीची गळचेपी करायला ह्या दोन सरकारी FM वाहिन्या पण मागे नाहित.

आकाशवाणी मुंबईत दोन FM वाहिन्या चालवते FM गोल्ड आणि FM रेन्बो. आता ह्यातली FM रेन्बोचा आणि मराठीचा यत्किंचितही संबंध नाहि. हिचं FM रेन्बो वाहिनी चेन्नई ला चोवीस तास तामिळ, बंगळुरू ला पूर्ण वेळ कन्नड गाणी ऐकवते. जर तुमच्याकडे DTH सेवा असेल तर तुम्ही हे पडताळुन पाहु शकता. म्हणजे बघा खुद्द मायबाप सरकारलाच मराठीची कदर नाहि. दुसरी वाहिनी FM गोल्ड हिची परीस्थीती पण ह्यापेक्षा वेगळी नाहि पण इथे जरा बुडत्याला काठीचा आधार हा प्रकार आहे. आता हि वाहिनी चोवीस तासातले फक्त अठरा तासच चालु असते म्हणजे सक्काळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत. ह्यात मराठी कार्यक्रम लागतात ते फक्त पाच तास, सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत. त्यातही दर तासाला दहा मिनिट हिंदि आणि इंग्रजी बातम्या लावतात, म्हणजे इथेही मराठी बातम्यांना डच्चू. आता पहा पाच तासातले सुमारे चाळीस मिनिट तर इतर भाषिक बातम्यांनाच असतात. म्हणजे प्रत्यक्ष मराठी कार्यक्रम फक्त चार तास वीस मिनिटेच चालतो, म्हणजे आमच्या मुंबईत मराठीला एका सरकारी वाहिनीवर स्थान केवढ तर अठरा तासातले फक्त साडेचारच तास. आणि हो हे प्रक्षेपण सुद्धा नियमित नसतं म्हणजे जर क्रिकेटची मॅच असेल तर त्याची रनिंग कॉमेंट्री हि ह्याच वाहिनीवर मराठी कार्यक्रमांची आहुती देऊन ऐकवली जाते, जी FM रेन्बोवरुन पण ऐकवता येऊ शकते. ह्याच वाहिनीवर दुपारी तीन ते चार ह्या वेळात गुजराथी कार्यक्रम ऐकवले जातात, अहमदाबाद मध्ये असं काहि चालत असेल ह्यावर माझा तरी विश्वास नाहि. आता हि रड झाली सरकारी वाहिन्यांची, मराठी कार्यक्रमांकडे पाठ फिरवायची सरकारी वाहिन्यांची कारण अजुन तरी समोर आलेली नाहित.

जिथं कुंपणच शेत खात तिथ बाकीच्यांची काय तहा. इथल्या खासगी वाहिन्या तर मराठीवर पूर्णपणे बहिष्कार टाकल्या सारख्याच वागतात. मराठी गाणी ऐकवण त्यांना म्हणे डाऊन मार्केट वाटत, किती संताप येतो ना हे ऐकुन पण. ह्यांना ती टुकार पंजाबी गाणी लावायची लाज वाटत नाहि पण मराठीची मात्र लाज वाटते म्हणजे आमच्याच घरात राहुन आमचीच लाज वाटते. असं जरा चेन्नई मध्ये बोलून दाखवा म्हणजे काय हालत होईल ते कळेल. सेना प्रमुखांचा मान राखण्यासाठी मिरची वाल्यांनी रविवारी दुपारी बारा ते दोन ह्या वेळात मुंबई ढोल हा कार्यक्रम सुरु केला, पण हाच कार्यक्रम हे लोक रोज का नाहि ऐकवु शकत ह्याच उत्तर मिरचीवाले (किंवा राजकारणी) लोकच देऊ शकतील. एक दुसरी वाहिनी बीग FM यांनी मराठी म्युझिक अवॉर्ड, मराठी बीगिज असे पुरस्कारांचे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली आहे कारण त्याला प्रयोजक मिळतात ज्यातून भरपूर पैसा मिळतो. आणि हो आम्ही मराठीचा उदो करतो आहे हेही दाखवून देता येत, पण ह्यांना आपल्या रेडिओ वाहिनीवर मराठी कार्यक्रम ऐकवायची लाजच वाटते. ह्या खासगी वाहिन्या चोवीस तास कार्यक्रम प्रसारित करत असतात पण त्यातले दोन तासही मराठीला त्यांना द्यायची गरज वाटत नाहि. आता ह्या वाहिन्यांवरील रेडिओ जॉकि हेहि मराठी नसतात तेही इतर भाषिक असतात, पण तुम्ही जर ह्या वाहिन्यांच्या वेबसाईटवर जाउन पाहिल तर कोलकत्याच्या ह्यांच्याच वाहिनीवर सगळे रेडिओ जॉकि हे बंगालीच असतात मग आमच्या मराठी माणसात वाक्चातुर्य नाहि असं ह्यांना वाटत का? इंग्रजाळलेल्या हिंदीत अत्यंत बाष्कळ विनोद करत हे रेडिओ जॉकि कार्यक्रम सादर करत असतात, अर्थात ह्याला काहि अपवादही आहेत. पण एकंदरीतच हि परिस्थिती खूपच भिषण आहे. मी मुंबईचा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर शहरात काय परिस्थिती आहे ह्याची मला कल्पना नाहि.

मला अजुन कळत नाहि मराठीच ’राज’कारण करणाऱ्या ह्या राजकारण्यांना हि बाब अजुन कशी लक्षात ली नाहि का ते जाणून बुजून मुग गिळुन बसले आहेत? आपण म्हणतो मराठी चित्रपट चालत नाहित. आहो मुंबईत नवीन मराठी गाणी पण आलेली कळत नाहित. आज मुंबईतल्या बहुतांश लोकांची नाळ ह्या FM रेडिओशी जोडली गेली आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये FM रेडिओची सोय असते त्यामुळे बसमध्ये, रेल्वे गाडीत, कारमध्ये, घरात, अहो रस्त्यांवरून चालताना सुद्धा लोक हा FM रेडिओ ऐकत असतात. तेव्हा अशा ह्या हुकमी माध्यमावर मराठीला संधी मिळाली तर नक्कीच मराठीची जी पिछेहाट चालली आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. आज मराठी दूरचित्रवाणीचा TRP हिंदी दूरचित्रवाणीच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे हे ह्या खासगी वाहिन्यानी लक्षात घ्याव. आहो एवढच कशाला महाजालावर पण मराठी वेबसाईटना व्हिजिट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग FM रेडिओच्या बाबतीत हा सावत्रपणा का?

मला खात्री आहे लवकरच हे चित्र बदलेल आणि मुंबईतल्या सगळ्या FM वाहिन्या अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठीला तिचा मान देतील. पण तो सोनेरी दिवस कधी उगवेल हे देवच जाणे. मला त्या उज्ज्वल दिवसाची प्रतिक्षा आहे. तुम्हाला काय वाटत?

1 comment:

  1. अजुन निवडणूकीला वेळ आहे.एकदा निवडणूका जवळ आल्या शिवसेनेला आणि मनसेला या मुद्द्याची आठवण होईल. तो पर्यंत थांबा. दोघांनाही इ मेल पाठवले आहेत .. पण काही अ‍ॅक्शन घेतलेली नाही अजूनतरी -८ महिने झाले आहेत. मी पण यावर एक लेखलिहिला होता पुर्वी. रेडीओ मिर्ची नावाने..

    ReplyDelete