Saturday, September 18, 2010

बाप्पा मोरया !!!

खूप दिवसांपासून ज्याची वाट पहात होतो तो गणेशोत्सव आता सुरू झाला आहे. म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये तर बहुतेक घरातल्या गणेशाचे विसर्जन पण झाले आहे. साधारण ऑगस्ट महिना सुरु झाला कि आपल्याला बाप्पांची चाहूल जाणवू लागते. ठिकठिकाणी मुर्तींची दुकान मांडली जातात. मग आपली आवडती श्रींची मुर्ती निवडुन ती लवकरात लवकर बुक करणे सगळ्यात महत्वाच. एकदा का मुर्ती बुक झाली कि मग दुसर काम म्हणजे मुख्य दिवसाकरता गुरुजी(भटजी) शोधण. काहि ठिकाणी परंपरागत ठरलेले गुरुजी असतात, पण ज्यांच्याकडे अशी सोय नाहि त्यांना मात्र हे गुरुजी मिळण फार मुश्किलीच काम असतं. हल्ली तर बरेचजण सरळ सीडी लावुन पुजा करुन घेतात. मग एकदा का मुर्ती आणि गुरुजी बुक झाले कि मग पुढची तयारी सुरु होते ती म्हणजे सजावटिची. सार्वजनीक ठिकाणी तर मोठे मोठे मंडप घातले जातात आणि श्रींच्या सजावटिची तयारी सुरु होते.

ह्यावर्षी गणपती आणि ईद जोडूनच आल्यामुळे गणपतीच्या आदल्या दिवशी छान सुट्टी मिळाली त्यामुळे तयारी करायला भरपूर वेळ होता. तसं पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तयारी हि आदल्या दिवसापासूनच सुरु होते. पण ह्यावर्षी हक्काची सुट्टी मिळाल्यामुळे सकाळी उठून दुसर्या दिवशी लागणार पूजेचं साहित्य, मग सजावटीचे साहित्य असं सगळ विकत आणल. पण खरी सजावटिला सुरुवात संध्याकाळीच केली, रात्री उशीरापर्यंत जागून सजावट पूर्ण केली तेव्हा कुठे झोप लागली. शनिवारी सकाळी साधारण दहा वाजेपर्यंत श्रींची मुर्ती "बाप्पा मोरयाचा" जयघोष करत घरी आणली, तोवर गुरुजी आलेच होते. मग गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मनोभावे श्रींची प्रतिष्ठापना केली, आरती करुन श्रींना विविध पदार्थ असलेल सुग्रास जेवण आणि २१ उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला. उकडीचे मोदक म्हणजे बाप्पांचा आवडता पदार्थ, खरच जसे बाप्पा आपल्याला विशेष तसा त्यांचा हा आवडता पदार्थही विशेषच. माझ्यामते असा कुणीच नसेन ज्याला उकडीचे मोदक म्हटल कि तोंडाला पाणी सुटत नसेल. मग दुपारची छान जेवण झाली, मोदकांवर मनसोक्त ताव मारल्यावर एक छान वामकुक्षी झाली. संध्याकाळि बाप्पाच्या दर्शनाला येणार्या लोकांचा राबता सुरु झाला तो पुढचे पाच दिवस सुरुच होता.

अशा या उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवार कधी आला कळलच नाहि, सकाळपासून खूपच उदास वाटत होत कारण आज बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस होता. गेले पाच दिवस घरातला एक माणूसच बनून राहिलेले बाप्पा त्यांच्या घरी जाणार होते. आज बाप्पांना तळलेल्या मोदकाचा नैवेद्य होता. दुपारची जेवण झाल्यावर साधारण चार वाजता गुरुजी आले ते उत्तरपूजा सांगण्याकरता. उत्तरपूजा सांगून झाल्यावर श्रींच्या नावाचा जयघोष करत आणि त्यांना पुढच्या वर्षि लवकर या असं आमंत्रण देत जवळच असलेल्या खाडीत विसर्जन केल. बाप्पा गेले पण जाताना पुढच्या वर्षि लवकर यायची साद देऊन गेले.

गणपती बाप्पा मोरया !!!

No comments:

Post a Comment